कोण आहे अजित तिवडे.?

ना पद, ना पक्ष, ना राजकीय वारसा.. तरीही जनतेचा प्रचंड विश्वास.!
सत्ताधाऱ्यांना धडकी
, राजकीय गणित कोलमडण्याच्या मार्गावर.!

कोल्हापूर | प्रतिनिधी 

आजच्या राजकारणात पद, पक्ष आणि सत्तेची गणिते केंद्रस्थानी असताना गेल्या चार वर्षांपासून एक सामान्य व्यक्ती

कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार नसताना केवळ कामाच्या जोरावर जनतेच्या मनात स्थान निर्माण करत आहे. अजितदादा भगवान तिवडे हे नाव आज कोल्हापूरमधील तरुण, वयोवृद्ध, महिला आणि गरजू घटकांमध्ये आशेचे प्रतीक बनले आहे.

ना कोणते पद, ना पक्षाची साथ, ना राजकीय पार्श्वभूमी. तरीही समाजासाठी झटणारा हा माणूस दिवसभर आपली कामे करून समाजोपयोगी कामे करताना दिसतो. रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, आरोग्य व रक्तदान शिबिरे आयोजित करणे, तरुणांना व्यसनमुक्तीच्या मार्गावर आणण्यासाठी समजावणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठाम व कठोर भूमिका घेणे- ही कामे त्यांनी कोणत्याही प्रसिद्धीच्या अपेक्षेविना केली.

कर्जबाजारीपणामुळे आयुष्याला कंटाळलेल्या अनेक तरुणांना त्यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर त्यांना नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी मार्गदर्शन करून आत्मविश्वास दिला. त्यामुळेच आज अनेक कुटुंबे पुन्हा उभी राहिली आहेत.

सत्तेच्या राजकारणाला छेद देणारा निर्णय

आज जिथे पक्षांतर, तिकीट न मिळाल्याची नाराजी आणि सत्तासंघर्ष सुरू आहे, तिथे अजित तिवडे यांनी कोणताही राग-रोष न धरता अपक्ष निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. “निवडणूक ही पक्षाच्या तिकिटावर नाही, तर केलेल्या कामाच्या पोचपावतीवर जिंकली पाहिजे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पुढील पाच वर्षांचा ठोस आराखडा

रुईकर कॉलनी परिसरात वास्तव्यास असल्याने तेथील नागरिकांच्या अडचणींचा सखोल अभ्यास करून गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी अनेक ठिकाणी विद्युत खांबांची व्यवस्था करून दिली. वनसंवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण, अतिवृष्टी व आपत्तीग्रस्त भागात तातडीने मदत पोहोचवणे अशी कामे सातत्याने त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत.

म्हणूनच जनतेचा घोळका

राजकीय घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारा हा नेता आज कोल्हापूरच्या जनतेसाठी नवा पर्याय ठरत आहे. म्हणूनच “कोण आहे अजित तिवडे?” या प्रश्नाचे उत्तर आज एकच आहे-
तो जनतेतून उभा राहिलेला, जनतेसाठी झटणारा नेता आहे.


महायुती व महाविकास आघाडीच्या नेतृत्वामुळे कोल्हापूर शहराची अधोगती: श्री. राजू माने

कोल्हापूर | प्रतिनिधी

गेल्या वीस वर्षांपासून कोल्हापूर शहराच्या विकासाबाबत सत्तेत व विरोधात असलेले महायुतीचे श्री. धनंजय महाडीक आणि महाविकास आघाडीचे श्री. सतेज पाटील हे युवा नेते महापालिका निवडणुकीपुरते एकमेकांविरोधात शड्डू ठोकतात; मात्र निकाल लागल्यानंतर शहराचा कारभार मोजक्याच नगरसेवकांच्या हाती सोपवला जातो. अशा परिस्थितीत शहराचा सर्वांगीण विकास कसा होणार, असा सवाल एस-फोर ए विकास आघाडीचे नेते श्री. राजू माने यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

नगरसेवकांचे प्रमुख कर्तव्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवणे हे असताना, या तथाकथित युवा नेत्यांनी आजवर शहराच्या विकासासाठी नेमकी कोणती ठोस कामगिरी केली, यावर नागरिकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे माने म्हणाले. शहर हे उद्योग व रोजगारनिर्मितीचे केंद्र असते; मात्र कोल्हापूरमध्ये नवीन उद्योग किंवा रोजगार निर्मितीसाठी या नेत्यांनी कोणते प्रयत्न केले, यावर कोणतीही ठोस चर्चा होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

निवडणुकीत नागरिकांची दिशाभूल करून विजय मिळवणे हाच त्यांचा खरा ‘उद्योग’ बनला असून, दुर्दैवाने आजचा युवा वर्गही या सिस्टीमच्या आहारी गेलेला आहे. या परिस्थितीतून युवक कधी बाहेर पडणार, असा प्रश्न उपस्थित करत प्रत्येक नागरिकाने या नेत्यांना विकासाबाबत जाब विचारला पाहिजे, असे आवाहन माने यांनी केले.

याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहराच्या विकासासाठी तिसऱ्या आघाडीचा पर्याय म्हणून एस-फोर ए विकास आघाडी समोर येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. ही आघाडी केवळ विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांसमोर आली असून, खालील प्रमुख मुद्द्यांवर काम करण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

प्रमुख विकास मुद्दे :

1.    मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर यांसारख्या शहरांची अनेक वेळा हद्दवाढ झाली असताना कोल्हापूरची हद्दवाढ का झाली नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (KMRDA) स्थापन करण्याचा ठराव पहिल्याच महासभेत मांडण्याची भूमिका.

2.    पुढील ८ ते १० वर्षांत हद्दवाढ होणे अशक्य असल्याचे वास्तव नागरिकांसमोर मांडून, कोल्हापूर मेट्रोसिटी विकासासाठी ठोस आराखडा.

3.    म्हाडा व सिडकोच्या माध्यमातून सामान्य नागरिकांसाठी परवडणारी घरे तसेच ३० मीटर रुंदीचे रस्ते व डी.पी. प्लॅनमधील रस्त्यांची अंमलबजावणी.

4.    छत्रपती शाहू मिल परिसरात सांस्कृतिक वारसा विकास प्रकल्प राबविणे व शहरालगतच्या ५ किमी परिसरात महापालिकेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.

5.    टी.पी. स्कीम १ ते ५ तसेच उर्वरित क्षेत्रातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा.

6.    शहरातील प्रमुख प्रवेशद्वारांवर कोल्हापूरच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भव्य स्वागत कमानी व ऐतिहासिक चौकांचे सुशोभीकरण.

सर्व जाती-धर्मांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून किमान १०० एकर जागेची मागणी.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये सामंजस्य करार;

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून घडणार उद्योजक

मुंबई: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्यांचा विकास करून त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवसाय व्यवस्थापन विभाग आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर (MACCIA) यांच्यात शनिवारी, ३ जानेवारी २०२६ रोजी महत्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. विद्यापीठाच्या सभा कक्षात हा करार हस्तांतरण कार्यक्रम पार पडला.

शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्राची भक्कम युती

शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील दरी कमी करणे, हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे. या कराराच्या माध्यमातून कौशल्य विकास, नवोपक्रम (Innovation), शिक्षक क्षमता वृद्धी, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप तसेच उद्योगांमधील प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्यासाठी दोन्ही संस्था एकत्रितपणे काम करणार आहेत.

गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेला चालना

यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी चेंबरची स्थापना, कार्यपद्धती व आगामी उपक्रमांची माहिती दिली. प्रत्येक गावात उद्योजक निर्माण व्हावेत या उद्देशाने ‘गाव तिथे उद्योजक’ आणि ‘उद्योग विचार मंच’ यांसारखे उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील युवकांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन व भांडवल उपलब्ध करून देण्यावर चेंबरचा भर आहे. तसेच जागतिक स्तरावर व्यापार व उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबरने ६० देशांशी सामंजस्य करार केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

ग्रामीण महाविद्यालयांवर विशेष लक्ष- कुलगुरू

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी या कराराचे स्वागत करताना सांगितले की, “हा करार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. प्रत्येक तालुक्यात एका महाविद्यालयाला ‘हब’ म्हणून विकसित करून त्या माध्यमातून परिसरातील इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे प्रशिक्षण दिले जाईल.”
या उपक्रमामुळे नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीच्या शोधात न राहता स्वतःचा उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे, कार्यकारिणी सदस्य सी. पी. ठक्कर, महासचिव सुरेश घोरपडे, सदस्य राजन ठवकर, कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मेधा कानेटकर, व्यवसाय व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. राहुल खराबे तसेच रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन उपस्थित होते.





Contact For News, Advertising& Promotions:

www.kolhapurnews24hrs.in

kolhapurnews26@gmail.com